“नास्तिक दिन” सबंधी समज गैरसमज

जाहीरनामा, आम्ही नक्की कोण, आमचे ध्येय इत्यादी. . . . .
mhatheist
Site Admin
Posts: 4
Joined: Wed Jan 27, 2016 1:36 pm

“नास्तिक दिन” सबंधी समज गैरसमज

Postby mhatheist » Wed Jan 27, 2016 6:04 pm



1) नास्तिक दिन का? तुम्हाला वेगळेपण दाखवायचे म्हणून नास्तिक दिन साजरा करायचा आहे का?


असा वेगळा दिन पाळण्यामागचा हेतू वेगळेपणा दाखवणे नसून उलट आम्ही देखील या समाजाचा घटक आहोत असे सांगणे असते.

नास्तिक म्हणजे वाईट माणूस अशी ओळख सिनेमा आणि प्रसारमाध्यमातून तसेच साहित्यातून होत असते त्यामुळे बरेच जण आपण नास्तिक आहोत असे सांगणे टाळतात. समाजामध्ये असे लोक देखील आहेत कि जे “देव” आणि “धर्म” या कल्पनेशिवाय जगू इच्छितात. समाजामधील नास्तिक असण्याशी जे गैरसमज आहेत ते दूर करणे, हि प्रमुख संकल्पना “नास्तिक दिन” पाळण्यामागे आहे.



2) नास्तिक माणसे जास्त बुद्धिमान आणि नैतिक असतात असा तुमचा दावा आहे का ?

व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचा आणि चांगुलपणाचा धर्म आणि देव यांच्या श्रद्धेशी काही सबंध नसतो. व्यक्तीच्या देव धर्म विषयक श्रद्धावर आधारित त्याचे माणूसपण सिद्ध होत नाही. हेच तर आम्हाला सांगायचे आहे. त्यामुळे कोणत्याही अर्थाने माणसाचे मूल्यमापन त्याच्या धार्मिक श्रद्धांच्या आधारे करण्यापेक्षा त्याच्या वर्तनाच्या आधारे करावे हेच तर आम्हाला सांगायचे आहे.



3) २३ मार्च हा दिवस शहीद दिन म्हणूनही ओळखला जातो. मग या दिवशी नास्तिक दिन न घेता इतर दिवशी घेता आला नसता का?


२३ मार्च १९३१ या दिवशी थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. तिघांचे बलिदान हे केवळ रोमांचकारी कल्पनांनी प्रेरित नव्हते. त्यामागे सर्वकष क्रांतीचे ध्येय होते. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय जोखडातून मुक्तता इतक्या मर्यादित अर्थाने त्यांनी बलिदान केले नव्हते तर इथल्या कष्टकरी जनतेला स्वातंत्र्य आणि समृद्धीचा हक्क मिळायला हवा, हे ध्येय त्यांनी ठेवले होते. त्यामुळे या तीन क्रांतिकारकांचे बलिदान भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अजरामर आहे. म्हणूनच हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा होतो.

परंतु या बरोबर जी आणखीन एक बाजू आहे ती पूर्णपणे दुर्लक्षित आहे, ती म्हणजे शहीद भगतसिंग यांचे ईश्वर या कल्पनेबद्दलचे चे परखड मत!! तुरुंगात असताना त्यांनी गुरुमुखीत “मी नास्तिक का आहे?” असा निबंध लिहून ईश्वरविषयक मत व्यक्त केले होते. मरणाच्या जवळ असताना हि त्याने ईश्वराची प्रार्थना केली नाही.

“नास्तिक असणे म्हणजे केवळ ढोंग आहे”,

“अशा व्यक्ती स्वार्थी असतात”,

“जेव्हा जीवावर संकट येईल, तेव्हा त्यांना देव आठवेल”,

“नास्तिक व्यक्ती तत्त्वहीन असतात”,

अशा अनेक स्वरूपाच्या गैरसमजांना शहीद भगतसिंग यांच्या उदाहरणाने छेद जातो. म्हणून हा दिवस शहीद दिनाच्या बरोबरीने नास्तिक दिन म्हणूनही ओळखला जावा, असे आम्हाला वाटते. खरे तर त्याचे क्रांतिकारी विचार आणि नास्तीकत्व या दोन्ही बाबी वेगळ्या आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. जेव्हा एखाद्या सर्वोच्च शक्तीचा प्रभाव स्वीकारतो तेव्हा विचारावर मर्यादा येतात. शोषणाचे मूळ, नशीब किवा अतींद्रिय शक्तीच्या इच्छेमध्ये नसून मानव निर्मित आहे हा त्यांच्या क्रांतिकारी तत्वज्ञानाचा गाभा आहे. त्यामुळे ईश्वर नाकारणे आणि त्याचे क्रांतिकारी विचार वेगळे करता येत नाहीत.



4) “नास्तिक” या शब्दाची व्याख्या काय?

वेगवेगळ्या कालखंडात “नास्तिक” या शब्दांची व्याख्या बदललेली आढळते. आज सर्व सामान्य पणे “देव नाकारणारा” अशी नास्तिक शब्दाची ओळख आहे. परंतु नास्तिक या शब्दाची जुनी व्याख्या “वेद नाकारणारे” अशी आहे. धार्मिक कर्मकांड न मानणा-या व्यक्तीना देखील तो नास्तिक आहे असे म्हटले जाते. काही धर्म “त्यांचा देव” न मानता इतर देव मानणा-या लोकांना नास्तिक असे संबोधतात. अगदी काटेकोर व्याख्या करायची झाल्यास “विश्वाची निर्मिती करणा-या आणि मानवा सहित सर्व विश्वाचे नियंत्रण करणा-या सर्वशक्तिमान अलौकिक शक्ती” चे अस्तित्व नाकारणा-यांना “निरीश्वरवादी म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल”. परंतु “नास्तिक” हा शब्द सर्वात जास्त प्रचलीत आहे. त्यामुळे तोच शब्द वापरात आणणे जास्त सोयीस्कर ठरेल.


5) देव नाही हे तुम्हाला सिद्ध करता येईल का? देव नसेल तर विश्वाची निर्मिती कुणी केली?


या प्रश्नाचे उत्तर जसे जबाबदारीने देणे अपेक्षित आहे तसे ते जबाबदारीने समजून घेणे हि अपेक्षित आहे. प्रामाणिक पणे सांगायचे तर विश्व निर्माण कसे झाले? याचे उत्तर कुणालाच माहीत नाही. आपल्यासमोर आहेत ते त्या उत्तराचे अंदाज !! म्हणून तर विविध धर्मात त्याबद्दल एकवाक्यता नाही. विश्व हे देवाने निर्माण केले असेल तर देवाला कुणी निर्माण केले हा प्रश्न उरतोच. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर “त्या अगोदर काय होते?” अशा पद्धतीनेच सोडवता येऊ शकते.

हे जग देवाने निर्माण केले असे मानणारे बहुसंख्य लोक असले तरी हे जग स्वयंभू आहे असे मानणारे हि जगात मोठ्या संख्येने आहेत. दोन्ही मतांचा सारखाच आदर करायला हवा. त्यात देव नाकारणे म्हणजे “तुम्ही स्वत:ला मोठे शहाणे समजता का?” असा प्रश्न विचारणे संयुक्तिक नाही.



6) “समाजाच्या भल्यासाठी आणि नैतिक मूल्ये जपण्यासाठी ‘देव’ आणि ‘धर्म’ या कल्पना असणे गरजेचे वाटत नाही का? तुम्ही लहान असताना देवाच्या भीती मुळेच नैतिकतेचे धडे गिरवले असणार. त्यामुळे आता नास्तिक झाल्यावर हि त्या नीती मूल्यांचा प्रभाव तुमच्यावर आहे. पण लहान पणीच “देव नाही असे सांगितले” किवा “धर्माबद्दल चुकीची कल्पना रुजवली” तर नैतिक मूल्ये कशी रुजवणार?

धर्म आणि देवाची कल्पना नैतिक मूल्यासाठी आवश्यक असतात अशी बहुतांशी लोकांची कल्पना असते. परंतु ते तितकेसे खरे नाही. शेकडो वर्षाच्या धर्माच्या कारकीर्दीत नैतिक मूल्याच्या कल्पना रुजलेल्या दिसत नाहीत. माणसाचे स्वार्थीपण सर्व प्रकारच्या भीतीला नाकारून व्यक्त होताना उघडपणे दिसते. धर्म आणि देव मानणारे लोक हि उघडपणे भ्रष्टाचार आणि इतरांच्या मानवी हक्काची पायमल्ली करताना दिसतात. स्वीडन या देशात नास्तिकांचे प्रमाण जास्त आहे तरीदेखील त्या देशातील कायदा आणि सुव्यवस्था आदर्श मानावी अशी आहे.

नैतिक मूल्ये म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर देखील काळ आणि प्रदेश या घटकांवर अवलंबून असते. तालिबान च्या सत्तेत स्त्रीने बुरखा न घालणे, म्हणजे नैतिक मूल्ये न पाळण्याचे लक्षण असते. अगदी भारतातही अनेक उच्चशिक्षित मुस्लीम स्त्रिया बुरखा घालतात. फक्त मुस्लीम धर्मात असे चालते असे नसून हिंदू मध्येही डोक्यावर पदर ठेवणारी स्त्री जास्त नैतिक मानली जाते. एकेकाळी जातीच्या मर्यादेत राहणे नैतिकतेत बसत होते आज ते समता या मूल्यांच्या आधारावर अनैतिक ठरते. नीती मूल्यांच्या कल्पना अशा धर्म, प्रदेश आणि काळ या संदर्भात बदलत असताना, सारासार विचार करता “स्वातंत्र्य, समता आणि बंधुता” हि मूल्ये नैतिकतेच्या कसोटीवर टिकतात. स्वत:चे हक्क जपत असताना इतरांच्या हक्काचा आदर करावा हे मूल्य आपण स्वीकारायला हरकत नाही कारण ते सर्वांच्याच हिताचे आहे. हे मूल्य देव आणि धर्म या कल्पनेशिवायही शिकवता येऊ शकते. अर्थात ते देव आणि धर्म या आधारे कुणाला शिकवायचे असेल तर त्यात आमचा विरोध असायचे काही कारण नाही.



7) आधीच आजूबाजूला स्वार्थी आणि भ्रष्टाचारी वातावरण असताना समाज अधिक धार्मिक बनवणे गरजेचे असताना “देव, धर्म खोटे आहे” असे सांगण्याने तुम्ही समाज अधिक भ्रष्ट व्हायला मदत करीत आहात.

मुळात नास्तिक दिवस साजरा करण्यामागे इतरांनी नास्तिक बनावे असे सांगण्याचा हेतू नाही. तर आम्ही आमच्या आयुष्यात देव मानत नाही असे सांगणे असा हेतू आहे. माणूस अधार्मिक झाला म्हणून भ्रष्ट्राचारी झाला असे म्हणणे धाडसाचे ठरेल. किवा केवळ कुणी देव मानतो म्हणून नैतिक आहे असे मानणे देखील भाबडेपणाचे ठरेल. माणसाच्या स्वार्थी वृत्तीवर देव आणि धर्माच्या कल्पना अंकुश ठेवू शकत नाही हेच यातून सिद्ध होते. यामध्ये नास्तिक व्यक्ती अधिक नैतिक असतात असाही दावा करण्याचा आमचा हेतू नाही. देव आणि धर्म यांच्या कल्पना आणि नैतिकता या दोन भिन्न बाबी आहेत.



८) “गर्व से कहो हम नास्तिक है”, म्हणणे अहंकारी वृत्तीचे लक्षण नाही का?


मुळात अशी घोषणा कुणीही दिलेली नसताना त्या आधारे नास्तिक माणसे अहंकारी आहेत असे म्हणणे वास्तवाला धरून नाही. नास्तिक असूनही आम्ही आनंदी आहोत, इतकेच नव्हे आमच्या परिसराशी आणि समाजाशी आमचे अर्थपूर्ण नाते आहे, हे सांगणे हा नास्तिक दिन पाळण्यामागचा हेतू आहे.

Return to “तुमचे येथे स्वागत आहे.”

Who is online

Users browsing this forum: No registered users and 1 guest