माझी नास्तिकता- माझा धर्म

minaso
Posts: 4
Joined: Mon Feb 01, 2016 10:41 am

माझी नास्तिकता- माझा धर्म

Postby minaso » Mon Aug 15, 2016 12:34 pm

माझी नास्तिकता- माझा धर्म

मी नास्तिक आहे. असे मला नाईलाजाने सांगावे लागत आहे. कारण परीक्षेत जसा योग्य पर्याय निवडा असा प्रश्न असतो त्याच्या उत्तरात शेवटचा पर्याय असतो - ‘वरील पैकी कोणताही नाही’. तसाच माझ्या पुढे प्रश्न होता- ‘तुझा धर्म कोणता?’ त्याला माझ्याकडे तो शेवटचा पर्याय होता - ‘वरील पैकी कोणताही नाही’. भारतीय घटनेने मला तो पर्याय निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. तो दिलेला नसता तरी माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. या शेवटच्या पर्यायाचे प्रचिलित नाव ‘नास्तिक’ असे आहे. म्हणजे माझ्या धर्माचे खरे नाव- ‘वरील पैकी कोणताही नाही’ असे आहे. पण सगळ्यांच्या सोईसाठी मी ‘नास्तिक’ हा शब्द वापरत आहे.

दुःख, संकट, आजार ही जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचा देव-धर्म, पाप-पुण्य, आत्मा-पुनर्जन्म याच्याशी काहीही संबध नाही. वैज्ञानिक प्रगतीने यातील बऱ्याच गोष्टी कमी केल्या आहेत व पुढेही कमी होत जातील. परंतू माणूस स्वतःच्या अविवेकीपणामुळे त्यात वेगाने भर घालत आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन, समता, बंधुता, न्याय या व अशा मुल्यांची जपणूक व पुरस्कार करून विवेकी समाजाकडे वाटचाल करणे, हा नास्तिकत्वाचा गाभा आहे, असे मी मानतो.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, उपासना स्वातंत्र, संचार स्वातंत्र्य हे भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल अधिकार आहेत. परंतू त्याने इतरांच्या अधिकारांवर आक्रमण होता कामा नये, ही मूलभूत अट आहे. म्हणून जेव्हा एखादा समूह वायू, जल, ध्वनी, विचार, आचार प्रदूषण करतो. सामाजिक स्वास्थ बिघडेल अशी कृती करतो, तेंव्हा त्याचा प्रतिकार करण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे. परंतू अशा परिस्थितीत माझा प्रतिवादी तो समूह नसून शासन, पोलिस व न्याय व्यवस्था आहे, असे मी मानतो कारण अशा गोष्टी रोखण्याची जबाबदारी त्यांची आहे व तेच त्याला उत्तरदायी आहेत.

धर्माची चिकित्सा करण्यात मला रस नाही. देव-धर्म या व्यक्तीगत बाबी असल्याने माझ्यापुरती चिकित्सा करूनच मी शेवटचा पर्याय निवडलेला आहे. मला इतर धर्मांच्या प्रभावाची व लोकसंख्येची भीती वाटत नाही. तसेच देव-धर्म ही कालबाह्य संकल्पना आहे, असे मी मानतो. १९८१ च्या जनगणनेत निधर्मी लोकांची संख्या दिड लाख होती, ती २०११ च्या जनगणनेत पंधरा लाख झाली आहे. म्हणूनच मला धर्म चिकित्सेच्या हक्कापेक्षा वैज्ञानिक दृष्टीकोन, मानवतावाद, चिकित्सक वृत्ती यांचा विकास करणे. हे कर्तव्य जास्त महत्वाचे वाटते. म्हणजे मासा देण्यापेक्षा मासे पकडायला शिकवावे, असे म्हणतात तसे, लोकांतील चिकित्सक वृत्तीचा विकास केला म्हणजे लोक त्यांच्या त्यांच्या धर्माची चिकित्सा करतील.
‘विचारांची लढाई विचारांनीच लढावी.’ म्हणजे लढाईतील दोन्ही पक्षाकडे सारखेच शस्त्र असावे. शस्त्रांच्या उत्क्रांतीचा इतिहास पाहता ‘विचार हे सर्वांत आधुनिक शस्त्र आहे. म्हणजे आधी हात, मग दगड, भाला, धनुष्य-बाण, तलवार, बंदुक.... आणि शेवटी विचार. मग आपण विचारांचे आधुनिक शस्त्र घेऊन लढाईला जायचे आणि समोरच्याकडे ते शस्त्र नसले तरी त्याच्या कडून तशी अपेक्षा करणे योग्य नाही. मग याला पर्याय काय ?
एक- आपण बंदुक वापरणे,
दुसरा- प्रतिपक्षाकडे विचाराचे शस्त्र येई पर्यंत त्याला वेळ देणे आणि
तिसरा- त्यांना विचारांचे शस्त्र तयार करायला व वापरायला शिकवणे. मगच ही लढाई तुल्यबळ होईल.
मला तिसरा पर्याय जास्त योग्य वाटते.

सर्वच दहशतवादी लहान मुलांना, तरूणांना भावनिक आवाहने करून त्यांचे विचाराचे शस्त्र बोथट करत असतात व बंदुक हेच योग्य शस्त्र आहे असे बिंबवतात. आणि ते त्यात मोठ्या प्रमाणात यशस्वीही होत आहेत. म्हणजे आपणच विचारांचे शस्त्र बनवायला आणि ते यशस्वीपणे चालवायचे प्रशिक्षण द्यायला कमी पडतो असा याचा अर्थ होतो.

‘सर्व माणसे एकाच बापाची लेकरे आहेत.’ ही सर्वच धर्मांची शिकवण आहे. पण ती आचरणात कोणीच आणत नाही. त्यामुळे सर्वच धर्मांत असुरक्षिततेची भावना आहे. माझा नास्तिक धर्मही सर्व मानवांंस भावंडे मानतो, पण ही गोष्ट माझ्याही वागण्यात दिसत नसेल, तर सगळे मलाही त्यांचा शत्रूच समजतील. त्यामुळे माझ्या ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’मुळे ते दुरावणार नाहीत, याची काळजी मलाच घ्यावी लागेल आणि समता, बंधुता, आपुलकी, प्रेम यांच्या अभिव्यक्तीवर जास्त भर द्यायला हवा. नाहीतर माझा ‘नास्तिक धर्म’ही इतर धर्मांप्रमाणे अयशस्वी होईल.
- मिनासो.
२८ सप्टेंबर २०१५

Return to “लेख”

Who is online

Users browsing this forum: No registered users and 1 guest